गोरक्षला सुप्रीम कोर्टातही फाशी नाही
नगर जिल्ह्यातील हिवरे कोरडा गावात वडील, सावत्र आई व सावत्र बहीण या तिघांचा खून करणार्या गोरक्ष अंबाजी अडसूळ यास फाशी देण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला.
गोरक्षने केलेला हा गुन्हा कितीही क्रूर असला तरी जमिनीच्या वाटणीवरून घरात होणार्या नित्याच्या भांडणांमुळे वैतागून त्याने हा गुन्हा केला आहे हे लक्षात घेता ज्यासाठी फाशी हीच अपरिहार्य शिक्षा ठरावी अशा विरळात विरळा या वर्गात मोडणारा हा गुन्हा नाही, असे म्हणून न्यायालयाने फासावर लटकविण्यास नकार दिला. गोरक्षने या तिघांप्रमाणेच पत्नीलाही पेढय़ातून विष दिले. यावरून तो मनाने किती उद्विग्न झाला होता हे स्पष्ट होते.
लष्करातील गोरक्षने वडील अंबाजी, सावत्र आई जनाबाई व सावत्र बहीण रेश्मा यांना आधी पेढय़ातून गुंगी येणारे औषध खायला घातले व नंतर गळे आवळून त्यांचे खून केले होते. गोरक्ष एवढच करून थांबला नाही. त्याने वडिलांचे प्रेत एका ट्रंकेत भरून ती ट्रंक अहमदनगर रेल्वे स्थानकात गोवा-निजामुद्दीन एक्स्प्रेमध्ये ठेवले तर आई व सावत्र बहिणाची प्रेते आणखी एका ट्रंकेत भरून ती ट्रंक नांदेड-पुणे रेल्वेगाडीत नेऊन ठेवली होती.