बस-जीप अपघातात चार भाविक ठार
पंढरपूरहून विठ्ठलभक्तांना घेऊन जाणारी ट्रॅक्स जीप विरुद्ध दिशेनं येणा-या एसटीवर धडकल्यानं झालेल्या भीषण अपघातात चार भाविकांचा जागीच मृत्यू झाला असून नऊ जण जखमी झाले आहेत. परभणी जिल्ह्यातल्या सोनपेठ तालुक्यात गंगाखेड-परळी मार्गावर आज ही दुर्घटना घडली.
आषाढी एकादशीनिमित्त विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी हिंगोली जिल्ह्यातल्या दोन गावांमधील भाविक पंढरपूरला गेले होते. तिथून आपल्या घरी परतत असताना काळानं त्यांच्यावर घाला घातला. या भाविकांना घेऊन भरधाव वेगानं जाणारी ट्रॅक्स जीप बसवर जाऊन आदळली. ही धडक इतकी भीषण होती की, पांडुरंग पडोळे (४५), माधव पडोळे (५५), मुगाची पडोळे (३०) हे तिघं जागीच ठार झाले. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या बालाजी रेणगडे (४०) यांचा परळी इथल्या हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. ट्रॅक्स गाडीतले आठ जण आणि बसमधील एक प्रवासी या अपघातात जखमी झाला आहे. ट्रॅक्सचालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला असावा, असा अंदाज आहे.