दहावीतील मुलीला जिवंत जाळले
विनयभंगाला विरोध करणा-या दहावीतील मुलीच्या अंगावर रॉकेल ओतून तिला जिवंत जाळल्याची खळबळजनक घटना बीडमधील केज तालुक्यात घडली. ती मुलगी मरण पावली असून, तिला जाळणा-या आरोपीचा पोलीस कसून तपास करत आहेत.
केज तालुक्यातील नंदुरघाट गावात ही घटना घडली. साधना जाधव नावाची विद्यार्थिनी दहावीत शिकत होती. गिरवळी येथील महारूद्र मोटे कॉलेजात डी. एड्.च्या दुस-या वर्षाला असलेला जीवन आबा काळे नावाचा विद्यार्थी तिला नेहमी त्रास देत असे. बुधवारी रात्री तो थेट तिच्या घरी गेला आणि त्याने तिची छेड काढायला सुरूवात केली. साधनाने त्याला विरोध करताच संतापलेल्या जीवनने आपल्याकडील कॅनमधून तिच्या अंगावर रॉकेल ओतले आणि तिला पेटवून दिले.
जबर भाजल्याने साधनाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर जीवन काळे फरारी झाला असून, पोलीस त्याचा तपास करत आहेत.