मनमाड पॅसेंजरवर दरोडा

12/07/2011 22:17

नांदेडहून मनमाडकडे जाणाऱ्या पॅसेंजर रेल्वेवर रात्री अडीच वाजल्याच्या सुमारास ७ ते ८ जणांनी दरोडा टाकून लाखोंचा ऐवज लुटला. या घटनेत काही प्रवाशांना किरकोळ जखमा झाल्या. प्रवाशांच्या या लुटमारीपेक्षा अगोदर वैजापूर पोलीस स्टेशन आणि नंतर मनमाड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करण्याचा दाविडीप्राणायाम औरंगाबाद पोलिसांच्या अज्ञानामुळे करावा लागला. महत्त्वाचे बाब म्हणजे १५ दिवसातील लुटमारीची ही तिसरी घटना आहे.

औरंगाबादवरून नांदेड-मनमाड गाडी दीडच्या सुमारास निघाली. दौलताबाद नंतर गाडीत आधीच बसलेल्या ७-८ जणांनी शस्त्रांचा धाक दाखवून प्रवाशांकडून रोख रक्कम, दागिणे व मोबाइल असा दोन लाखांचा ऐवज हिसकावून घेतला. विरोध करणाऱ्यांना मारहाण करण्यात आली. परसोडा रेल्वेस्थानकापर्यंत हा प्रकार सुरू होता. परसोडा रेल्वेस्थानकात गाडी थांबताच अंधाराचा फायदा घेत चोरट्यांनी पळ काढला. संतापलेल्या प्रवाशांनी पोलीस येईपर्यंत पहाटे साडेपाच वाजेपर्यंत गाडी परसोडा रेल्वेस्थानकात थांबून ठेवली होती. अखेर वैजापूर पोलीस दाखल झाले मात्र त्यांनी ही घटना मनमाड पोलिसांच्या हद्दीत येते असे सांगून प्रवाशांना मनमाडला जाण्यास सांगितले. नाईलाजाने प्रवाशांनी मनमाड पोलिसांकडे धाव घेतली. हद्दीच्या वादात जखमी प्रवाशांना वेळेवर मदत मिळू शकली नाही असा आरोप रेल्वे प्रवासी सेनेचे अध्यक्ष संतोष सोमानी यांनी सांगितले.


Make a free website Webnode