जिल्ह्यात १४ पोलिस अधिकार्यांच्या बदल्या
■ भाग्यनगरचे तारे यांच्याकडे इतवारा ठाण्याचा पदभार अनुराग पोवळे। दि.१0 (नांदेड)
जिल्ह्यातील १४ पोलिस अधिकार्यांच्या बदलीचे आदेश पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांनी रविवारी काढले आहेत. या आदेशात जिल्ह्यात नवनिर्मित विमानतळ पोलिस ठाणेही कार्यान्वित करण्यात आले असून पहिले अधिकारी म्हणून पोलिस निरीक्षक डी.जे. चव्हाण यांची नियुक्ती केली आहे. शहरातील भाग्यनगर ठाण्याचे पो.नि. एस.एम. तारे यांच्याकडे इतवारा ठाण्याचा पदभार सोपविण्यात आला आहे.
राज्य शासनाने भाग्यनगर ठाण्याचे विभाजन करून स्वतंत्र विमानतळ ठाण्यास मान्यता दिली. त्या मान्यतेनुसार या ठाण्याचा कारभार जिल्हा पोलिस दलाने सुरू करताना येथे पोलिस निरीक्षक डी.जे. चव्हाण यांची नियुक्ती केली आहे. नांदेड शहर वाहतूक शाखेतील पोलिस निरीक्षक ए.के. घुगे यांना हिमायतनगर ठाण्याचा स्वतंत्र पदभार देण्यात आला आहे. इतवारा ठाण्यात नेमणूक असलेले आणि सध्या शिवाजीनगर ठाण्याचे प्रभारी असलेले सी.जी. यशवंत यांच्याकडे भाग्यनगर ठाण्याचा काटेरी मुकुट सोपविण्यात आला आहे. नियंत्रण कक्षातील टी.के.शिंदे यांची शहर वाहतूक शाखेत बदली करण्यात आली. विमानतळ सुरक्षा पथकाचे पोलिस निरीक्षक डी.ए. पवार यांची जिल्हा विशेष शाखेत बदली झाली असून पोलिस निरीक्षक एस.एम. फुलझळके यांच्याकडे पुन्हा एकदा विमानतळ सुरक्षा पथकाची जबाबदारी दिली आहे. हिमायतनगरचे पो.नि.के.टी. लहासे यांची पोलिस अधीक्षकांचे वाचक म्हणून बदली झाली.
नियंत्रण कक्षातील जी.आर. फसले यांना वजिराबाद ठाण्यात दुय्यम पोलिस निरीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली. नियंत्रण कक्षातील एस.एस. चंदनशिवे यांच्याकडे पोलिस कल्याण विभाग सोपविण्यात आला. इतवारा पोलिस ठाण्यात नियंत्रण कक्षातील पोलिस निरीक्षक टी.डी. राठोड यांची बदली झाली. तर सोनखेडचे सहायक पोलिस निरीक्षक सी.टी. चौधरी यांच्याकडे उस्माननगर ठाणे सोपविण्यात आले. उस्माननगरचे सहायक पोलिस निरीक्षक एस.बी. निकाळजे यांची वजिराबाद ठाण्यात बदली करण्यात आली. नांदेड ग्रामीण ठाण्यातील सहायक पोलिस निरीक्षक एस.डी. नरवाडे यांना सोनखेड ठाण्याचा स्वतंत्र कारभार सोपविण्यात आला आहे. या अधिकार्यांना बदलीच्या ठिकाणी तत्काळ हजर होण्याचे आदेश पोलिस अधीक्षक उमाप यांनी दिले आहेत.